Showing posts with label Marathi Kavya. Show all posts
Showing posts with label Marathi Kavya. Show all posts

Monday, 28 December 2009

दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे.........

दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे

बकुळीच्या झाडाखाली, निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली, सुगंधी क्षणांत
त्या सगळया बकुळ फुलांची, शपथ तुला आहे

शुभ्रफुले वेचित रचिला, चांद तू जुईचा
म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
फुलातल्या त्या चंद्राची, शपथ तुला आहे

भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो, मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची, शपथ तुला आहे

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती, असे अंतरंगी
या उदास आभाळाची, शपथ तुला आहे..

Saturday, 5 December 2009

हे चांदणे फुलांनी....

हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली

तारे निळ्या नभात, हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा, फुलत्या नव्या कळीस
ओठातल्या स्वरांना का जाग आज आली

तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला स्वप्नातल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती स्वप्नात दंगलेली

वाटे हळूच यावा करपाश या गळ्यात
मैफिल ही सरावी ही धुंद त्या मिठीत
आनंद आगळा हा ही जाग आज आली


गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - अनुराधा पौडवाल
चित्रपट - चांदणे शिंपीत जाशी (१९८२)

Sunday, 22 November 2009

ऐरणीच्या देवा तुला....

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे

कुठे शोधिसी रामेश्वर....

कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप आसून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुनि मोती
हाय आभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे.....

Wednesday, 25 February 2009

माझी आवडती मराठी कविता......since school!

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवल दाटे
चोहिकडेक्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे!
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा!
तो उघडे;तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे!
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा!
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!
फडफडा करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;
सुंदरा हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती!
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष भामारोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले, पत्री खुडती!
देवदर्शना निघती ललजा, हर्ष माझ्या ह्रदयात!
वदनी त्याच्या वाचुन घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!
............................................. बालकवी

माझे आवडते मराठी गाणे.......रोज अनुभवायाचे....

उषःकाल होता होता, काळरात्र झाली 
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली...  
 
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी 
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी 
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....  
 
तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती 
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती 
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....  
 
उभा देश झाला आता एक बंदीशाला 
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला 
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....    
 
धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे 
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे 
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....